मुंबई: बारामती येथील विमान अपघातात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झालं. अजित पवारांच्या दुर्दैवी निधनाने सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत असून त्यांच्यावर प्रेम करणार्या असंख्य कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. अशातच राष्ट्रवादीच्या आमदारांसह अनेकांकडून या विमान अपघातात काही शंका उपस्थित केल्या जात आहेत. विमान अपघातात आधी सहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं, तर मग पाच जणांचे मृतदेह कसे सापडले, असा प्रश्न राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला होता. या सगळ्या शंकांबद्दल भाजपचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी आज आपलं मत मांडलं असून या घटनेला विनाकारण वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न होत आहे, असं ते म्हणाले.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, अजितदादांच्या विमानात सहा प्रवासी होते, हे दाखवणारा एकही पुरावा आजपर्यंत समोर आलेला नाही. सदर अपघातग्रस्त विमानात एवढे इंधन होते की ज्यामुळे त्यातील मृतदेह कोळशासारखे जळून खाक झाले. या अपघाताप्रकरणी आपण वेगवेगळे संशय निर्माण करून या घटनेला आपण निष्कारण वेगळी कलाटणी देत आहोत, असं माझं स्पष्ट मत आहे, असं निकम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जर कोणाचं म्हणणं असेल की या घटनेत काही कट होता, तर कायद्यानुसार कट सिद्ध होण्यासाठीही प्राथमिक पुरावा लागत असतो. असा प्राथमिक पुरावा आजपर्यंत आलेला नाही, असंही उज्ज्वल निकम म्हणाले.
अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलंय?
अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ङ्गङ्घमाझा विश्वास आहे व माझं मन देखील मला सांगत आहे की, दादा असे जाऊच शकत नाहीत. ज्यांनी हा देवमाणूस आपल्यापासून हिरावून नेत पाप केलं आहे, भविष्यात त्यांची चिता जाळणारा त्यांच्या घरात कोणी शिल्लक नसेल, अशा आक्रमक शब्दांत मिटकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.